पुणे : व्यावसायिक वादातून पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली, या कारणावरुन शरद मोहोळ याच्या सांगण्यावर त्याच्या टोळक्याने म्हाळुंगे येथील राधा चौकातून जाणार्या येणार्या गाड्यांवर दगडफेक केली. कुंड्या फेकून मारुन व्यावसायिकाच्या साथीदारांवर गंभीर हल्ला केला. वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शरद हिरामण मोहोळ (रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरुड), आलोक शिवाजी भालेराव (रा. वडाची वाडी, पौड रोड, कोथरुड), मल्हारी मसुगडे (रा. ताजणे वस्ती कॉर्नर, माळवाडी, पुनावळे), सिद्धेश बा. हगवणे (३०, रा. महाळुंगे) व त्याचे इतर ५ ते ६ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ८ रोजी मध्यरात्री सव्वा बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड विठ्ठल शेलार याने व्यावसायिक वादातून हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती. त्यामुळे गँगस्टर शरद मोहोळ याच्या सांगण्यावरुन सिद्धेश हगवणे, मल्हारी मसुगडे, आलोक भालेराव व त्यांच्या साथीदारांनी विठ्ठल शेलार व त्याचे साथीदार राधा चौकात असल्याचे समजून तेथे आले. त्यावेळी तेथून एक गाडी जात होती. ती विठ्ठल शेलार याची असल्याचे समजून त्यांनी गाडीतून पळून जाणार्या साथीदारांवर दगड व कुंड्या फेकून मारुन गंभीर हल्ला केला. तसेच राधा हॉटेल व तेथून येणार्या जाणार्या लोकांच्या जीवाची पर्वा न करता रोडवर दगडफेक केली.
वाहनांच्या काचा फोडल्या. लोकांमध्ये दहशत निर्माण केली. हा प्रकार समजताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी धावून गेले. तोपर्यंत टोळके तेथून पळून गेले होते. शरद मोहोळ या टोळीने सरपंचाचा अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याला व आलोक भालेराव यांना येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी दहशतवादी कातिल सिद्दीकी याचा नाडीने गळा आवळून खून केला होता. या खटल्यातून त्यांची पुरावा अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
विठ्ठल शेलार हाही मुळशी तालुक्यातील मुळचा राहणारा आहे. त्याच्याविरुद्ध खून, अपहरण, दरोड्याची तयारी आदी गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का कारवाई करण्यात आली होती. गुंडाच्या टोळ्यांमधील स्पर्धेतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.