गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन

0

मुंबई :  गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज (रविवार) सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झाले. त्या 92 वर्षाच्या होत्या. शनिवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली होती. आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे देशावर शोककळा पसरली. लतादीदींवर दादर येथील शिवाजी पार्कवर संपूर्ण शासकीय इतमामात सायंकाळी 7 वाजून 20 मिनीटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहून मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मनसे  प्रमुख राज ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, विरोधी पक्षातील नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लता मंगेशकर यांना त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी दिला.

आज सकाळी लता मंगेशकर यांचे पार्थिव ब्रीच कँडी हॉस्पटीलमधून त्यांच्या प्रभूकुंज येथील घरी नेण्यात आला.
त्यानंतर लष्कराच्या फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे आणण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचपद्धतीने लतादीदींनाही अखेरचा निरोप देण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या गुरुजींनी सतीश घाडगे यांनी अंत्यसंस्कार केले. त्यांनी लतादीदींवरही अंत्यसंस्कार केले. त्यांच्यासह एकूण 8 ‘गुरुजीं’नी भगवद्गीतेमधील 14 वा अध्यायाचे पठण केले.

दरम्यान, शिवाजी पार्कवर होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या संपूर्ण तयारीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत: लक्ष ठेवून होते. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेचे आयुक्त, तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.