हैदराबाद : ज्यांना हैदराबादचं नाव बदलायचंय, त्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. पण तरीही हैदराबादचं नाव बदलणार नाही, अशा शब्दांत खासदार असदुद्दीन ओवेसींनी मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींवर पलटवार केला आहे. ज्यांना शहराचं नाव बदलायचंय, त्यांना आता जनतेनंच प्रत्युत्तर द्यायचंय, असं म्हणत ओवेसींनी हैदराबादमधल्या मतदारांना साद घातली.
भाजपनं महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाचारण केलं आहे. त्यावर ओवेसींनी खोचक शब्दांत टीका केली. ‘भाजपनं या निवडणुकीत इतक्या लोकांना बोलावलंय की आता केवळ डोनाल्ड ट्रम्प यायचे राहिले आहेत. ते जरी आले तरीही काही होणार नाही. कारण मोदींनी त्यांना हात देत अबकी बार ट्रम्प सरकार म्हटलं होतं. पण ट्रम्प खड्ड्यात पडले. त्यांना लाख लाख वेळा मला जिन्ना म्हणावं.
आम्ही जिन्नाच्या हाकेला प्रतिसाद दिलाच नव्हता. जे रजाकार होते, ते पाकिस्तानात गेले आणि जे प्रामाणिक होते, ते हैदराबादमध्येच राहिले,’ असं ओवेसी म्हणाले.हैदराबादचं नाव भाग्यनगर करायला आलोय, ओवेसींच्या बालेकिल्ल्यात योगींची गर्जनाहैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करू, असं आश्वासन देणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यावर ओवेसींनी जोरदार टीका केली. ‘हैदराबादचं नाव बदलणं हेच भाजपचं लक्ष्य आहे. पण तुमच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील, पण हैदराबादचं नाव बदलणार नाही,’ असं प्रत्युत्तर ओवेसींनी दिलं. यावेळी त्यांनी भाजपच्या तिकीट वाटपावरही निशाणा साधला.
‘आम्हाला जातीयवादी म्हणतात. पण आम्ही तर हिदूंनाही उमेदवाऱ्या दिल्या आहेत. भाजपनं किती मुस्लिम उमेदवार दिले आहेत, ते सांगावं. त्यांना केवळ शहराचं नाव बदलण्यात रस आहे. त्यामुळे आता भाग्यनगर विरुद्ध हैदराबाद असा संघर्ष आहे,’ असं ओवेसींनी म्हटलं.काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हैदराबाद दौऱ्यानंतर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही येथील मल्काजगिरी येथे रोडशो करत जनतेला संबोधित केले. यावेळी योगी म्हणाले, ”आपल्या सर्वांना निश्चित करायचे आहे, की एका कुटुंबाला आणि मित्र मंडळाला लुटायचे स्वातंत्र्य द्यायचे, की हैदराबादला पुन्हा
भाग्यनगर करून विकासाच्या शिखरावर न्यायचे. बंधुंनो हे आपल्याला निश्चित करायचे आहे.”योगी आदित्यनाथ म्हणाले, “मला काही लोकांनी विचारले, की हैदराबादचे नाव भाग्यनगर होऊ शकते का? मी म्हणालो, का नाही? आम्ही फैजाबादचे नाव अयोध्या केले, अलाहाबादचे नाव प्रयागराज केले. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले. मग हैदराबादचे नाव भाग्यनगर का होऊ शकत नाही?”