महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा !: नाना पटोले

मुंबईबद्दलचे राज्यपालांचे वक्तव्य संतापजनक, महाराष्ट्राची माफी मागा

0

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता कोश्यारी यांनी बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे तसेच कोश्यारी यांची महामहिम राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालपदावरून उचलबांगडी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईच्या आर्थिक राजधानीबद्दल जे वक्तव्य केले ते संतापजनक आहे. बोलण्यापूर्वी त्यांनी व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. महाराष्ट्राने गुजराती व राजस्थानी समाजाला काय दिले त्याची माहिती कोश्यारी यांनी घ्यावी. अदानी, अंबानी व इतर असंख्य उद्योगपती गडगंज झाले यामध्ये मुंबई व महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा मोठा आहे. देशात मुंबईचे असलेले स्थान कोणीही नाकारू शकत नाही. राज्यपाल हे मानाचे व प्रतिष्ठेचे पद आहे पण कोश्यारी यांनी या पदाची प्रतिमा धुळीस मिळवली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही कोश्यारी यांनी अत्यंत हिनकस विधाने करून आमच्या थोर महापुरुषांचा अपमान केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका नेहमीच महाराष्ट्रविरोधी राहिली आहे. राज्यपाल पदावर राहून ते सातत्याने बेजाबदार वक्तव्य करत असतात पण आता त्यांनी मर्यादी ओलांडली आहे. आम्ही राज्यपालपदाची प्रतिष्ठा जाणतो पण ती प्रतिष्ठा त्या पदावरील व्यक्तींनीही जपली आहे पण दुर्दैवाने कोश्यारी यांच्याकडून तसे होताना दिसत नाही. महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाची दखल घ्यावी व त्यांना परत बोलावावे अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे पटोले म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.