‘स्पाईन रोड’ ची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा!

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची सूचना

0

पिंपरी : स्पाईन रोडचे प्रलंबित काम मार्गी लावून त्रिवेणीनगर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत करावी. त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तळवडे येथून आयटी आणि औद्योगिक पट्टयातून येणारी वाहतूक त्रिवेणीनगर भागातून स्पाईन रोड जातो. या रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्ता बाधितांचा प्रश्न मार्गी लागल्यास वाहतूक समस्या सुटणार आहे. त्यासाठी त्रिवेणीनगर चौकात जाणाऱ्या स्पाईनरोडमध्ये बाधित होणाऱ्या रहिवाशांचा रखडलेला पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे.
वास्तविक, या बाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या रस्त्यामध्ये एकूण १३२ रहिवाशी बाधित झाले आहेत. त्यापैकी ३९ बाधितांना भूखंड वाटप करण्यात आले आहे. उर्वरित बाधितांचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ आहे. 

स्पाईन रोड बाधितांच्या पुर्नवसनासाठी वाढीव भूखंड देण्याची मागणी सरकारकडे केली होती. या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, प्रशासकीय पातळीवर अद्याप कार्यवाही झालेली नाही.  रस्ता बाधित नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यासाठी प्राधिकरणाला महापालिका प्रशासनाने सुमारे २३ कोटी रुपये अदा केले होते. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत ३९ बाधितांचे पर्यायी जागेचे करार केले आहेत. उर्वरित करार अद्याप बाकी आहेत, असेही आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

बाधितांचा मोबदला देण्याची कार्यवाही करा…
स्पाईन रोड बाधितांचा विषय प्रलंबित असल्यामुळे सुमारे भूसंपादन प्रक्रिया गतीमान करावी. त्यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. भूसंपादनासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप पुढील कार्यवाही झालेली नाही. कागदपत्रे अपुरी असल्याचे कारण सांगून तांत्रिकदृष्या अडचणी सांगितल्या जात आहेत. ज्या बाधित नागरिकांनी जागा स्पाईन रस्त्यासाठी भूसंपादन केली आहे. त्यांना मोबदला देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.याबाबत प्रशासकीय पातळीवर तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.