पुणे : पुणे जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करुन त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश बन्सीलाल घायवळ (४४, रा.शास्त्रीनगर, कोथरूड, सध्या रा.सोनेगाव ता. जामखेड जि. नगर) याला जिल्हा ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा व भिगवण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता. २) रात्री उशीरा जामखेड येथील घऱातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पुण्यातील गॅंगस्टर गज्या मारणेवरील पोलिसांची कारवाई गाजत असतानाच, ग्रामिण पोलिसांनी गज्या मारणे याचा प्रतिस्पर्धी गुंड निलेश घायवळ टोळीच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने घायवळ टोळीचा म्होरक्या गँगस्टार नामे निलेश बन्सीलाल घायवळ याला अटक केली.
त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन १९८१ (एमपीडीए) कायदयातंर्गत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचेमार्फत पाठविलेल्या प्रस्तावावर जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्णय घेवून निलेश घायवळ यास एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश दिलेले आहेत.
घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ यास पोलीस अधीक्षक यांचे सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व भिगवण पो.स्टे. चे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवून जामखेड जि.अहमदनगर येथून ताब्यात घेवून आज पासून एक वर्ष स्थानबध्द करणेसाठी येरवडा मध्यवर्ती मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली आहे.