देशातील परिस्थिती पाहता भाजपला हटावविण्याची गरज आहे; त्याची सुरुवात पिंपरी-चिंचवडपासून करा : शरद पवार
पिंपरी : सर्वसामान्यांच्या माथी महागाई थोपविणारे, कामगार शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्तेची सूत्रे आहेत. देशात बेरोजगारी वाढत आहे. चुकीच्या धोरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, भाजपला सत्तेपासून दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. या बदलाची सुरुवात पिंपरी-चिंचवडपासून करा तसेच शहराचे भवितव्य ज्यांनी घडविले त्यांच्या हाती शहराचे नेतृत्त्व द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले.
काळेवाडी येथील थोपटे लॉन्स येथे रविवारी (दि. 17) शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, हनुमंत गावडे, जगदीश शेट्टी, वैशाली काळभोर, कैलास थोपटे, विशाल वाकडकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे आजी-माजी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, जगात तेलाचे दर कमी झाले तरी देशात मात्र त्याच्या उलटे चित्र पहावयास मिळत आहे. रोजच वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीमुळे घराचे “बजेट’ अडचणीत आले आहे. गरीब सर्वसामान्यांचा विचार करण्याऐवजी चिमूटभर उद्योजकांच्या फायद्यासाठी निर्णय घेतले जात आहेत. शेतकरी, तरुणवर्ग, कारखानदारी अडचणीत आणण्याचे प्रकार केंद्रातील सरकारकडून घेतले जात आहेत. जाणिवपूर्वक कामगारविरोधी धोरण राबविले जात आहे. नोकरीतून “कन्फर्मेशन’ हा शब्दच वगळण्यात आल्याने कधीही कोणालाही बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. याबाबी सर्वसामान्यांच्या हितासाठी बाधा आणणाऱ्या आहेत. जे कामगार विरोधी धोरण राबवितात त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी रोजच वाढत चालली आहे. आम्ही आमच्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी केल्यामुळे जो देश 2004 साली गहू, तांदूळ, फळे आणि भाजीपाल्याची आवक करत होता तो देश 2014 साली देशातील दुसरा निर्यातदार देश बनला याचा अभिमान आहे. केंद्रातील सरकार मात्र त्याच्या उलट धोरण राबवित आहे. भाजपकडून देशावर संकट आणण्याचे काम रोजच सुरू आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा प्रकार सुरू असून, पिंपरी-चिंचवड शहरातही सत्तेच्या माध्यमातून लूट सुरू आहे. भाजपाला सत्तेपासून दूर करण्याची वेळ आली आहे. देशातील या बदलाची सुरुवात पिंपरी-चिंचवडपासून होण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर करत ज्यांनी शहराचा विकास केला, भवितव्य घडविले त्यांच्या हाती नेतृत्त्व द्या, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.
कारखानदारीचे विकेंद्रीकरण
आमच्या हाती ज्यावेळी सत्ता होती; त्यावेळी आम्ही कारखानदारीचे विकेंद्रीकरण केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पुण्यापाठोपाठ रांजणगाव, चाकण, पारनेर, कुरकुंभ, बारामती, इंदापूर, शिरवळ या ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारल्या गेल्या. आम्ही कारखानदारी वाढेल आणि टिकेल यासाठी निर्णय घेतले. मात्र, भाजपाच्या काळात एकही नवीन औद्योगिक वसाहत उभी राहिली नाही अथवा एकही नवा उद्योग या परिसरात आला नाही. कारखाने उभे करण्यासाठी जे पोषक वातावरण हवे असते ते नसल्यामुळे कारखानदारी अडचणीत आल्याचा आरोप शरद पवार यांनी यावेळी केला.
चार लाख तरुणांच्या हाताला
“आयटी’मुळे रोजगार मिळाला
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आयटी कंपन्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करून त्यांना सुविधा दिल्यामुळे अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या परिसरात आल्या. या कंपन्यांमुळे चार लाखांहून अधिक तरुणांच्या हाताला रोजगार मिळाल्याचे यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले.
आयटी नगरी कशी उभारली याची आठवण सांगताना पवार म्हणाले, हिंजवडी येथे साखर कारखान्याच्या भूमिपूजनाला मी आलो होतो. तात्कालीन खासदार नानासाहेब नवले यांनीच मला भूमिपूजनाला बोलविले होते. मात्र हा साखर कारखाना हिंजवडीऐवजी दुसरीकडे उभा करा, अशी विनंती केली. या ठिकाणी आपण “आयटी’ची शेती करणार असल्याचे त्यांना सांगितले. यानंतर हिंजवडी, तळवडे व पुण्यातील मगरपट्टा येथे आयटी क्षेत्रातील कंपन्यांना आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यशही चांगले आहे. आज जी आयटी शेती फुलली ते पाहून समाधान वाटते.
या शेतीमध्ये तब्बल चार लाखांहून अधिकजण काम करत आहेत. त्यांच्या हाताला रोजगार मिळाल्याने आयटी क्षेत्र उभारण्याचा त्याकाळी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य ठरला. भाजप सरकारच्या काळात नवी एकही कंपनी आलेली नाही. हाताला काम देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले; मात्र त्यांनी कामगारांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचे काम केले. त्यामुळे कामगार, तरुण, महिला, कारखानदारी यांना अडचणीत आणण्याचे निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्यादृष्टीने काम करण्याची गरज असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.