पुणे : ज्येष्ठ महिलेला प्रासादातून गुंगीचे औषध देऊन तिची सोनसाखळी चोरल्या प्रकरणी अटक केलेल्या महिलेच्या गुजरात येथील घरातून फरासखाना पोलिसांनी ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट जप्त केले आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी तिच्या पोलिस कोठडीत चार दिवस वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
पिंकी परीयाल (वय ३४, मूळ रा. जमशेदपूर, झारखंड, सध्या रा. गुजरात) असे महिला आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. २५ जून २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता स्वारगेट बसस्थानक परिसरात ही घटना घडली. पिंकीने फिर्यादीना महिना दोन हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून रिक्षाने स्वारगेट भागात नेले. त्यानंतर फिर्यादींना प्रसादातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची साखळी व साडेसहाशे रुपये चोरले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने पिंकीला पुन्हा न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी दरम्यान तिच्याकडे केलेल्या तपासादरम्यान पेढ्यातुन गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून २५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ वितळून त्याचे बिस्कीट केल्याचे सांगितले. तिच्या गुजरात येथील घरातून २१ ग्रॅम आणि ५४ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे बिस्कीट जप्त करण्यात आले आहे.