सोलापूर : विशाखापट्टनमवरून मुंबईला तस्करीचे सोने घेवून जाणाऱ्या कार वर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये तीन कोटी रुपये किमतीचे सहा किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्याजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून एक किलो वजनाची सहा सोन्याची बिस्कीट नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर यावर कारवाई करण्यात आली आहे. चालकाच्या सीटखाली लॉकरमध्ये सोने लपवून ठेवले असल्याचे लक्षात आले.
यामध्ये तब्बल सहा किलो सोने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये कार चालकासह दोघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली असून पुढील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.