गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर खोचक टीका

0

सांगली : सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणाचा वाद आता चांगलाच पेटू लागला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याहस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करत आहे. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. स्मारकाचे लोकार्पण मेंढपाळाच्या हस्तेच झाले पाहिजे, अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी मांडली असून आजच संध्याकाळी चार वाजता हा सोहळा होईल, असे पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे. यावर बोलताना पडळकर यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.

पोलीस प्रशासन किंवा नेतेमंडळींनी कितीही विरोध केला तरी आज संध्याकाळी 4 वाजता लोकार्पण सोहळा पार पडेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. माध्यमांना कार्यक्रमासाठी बंदी घालायचं काय कारण ? हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे. हे रडीचा डाव खेळायला लागले आहेत. पालकमंत्री रात्रभर झोपलेच नाहीयेत तर काय करायचं. एसपींना झोपू देत नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांना झोपू देत नाहीत. पोलिसांना उन्हा – तान्हात तिथे तैनात ठेवलंय. काय कारण आहे ? असं पडळकर म्हणाले. ते सांगलीत बोलत होते.

जयंत पाटलांना मी आमदार झाल्यापासून सुचायचं बंद झालं आहे. बैलगाडा शर्यतीच्या वेळी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. 20 किमी परिघात सगळे पोलीस लावले होते. जिथे शेतकऱ्यांचे बैल होते, तिथे 2 – 2 पोलीस बैल रोखायला होते. तरी बैलगाडा शर्यत झाली. एकदा लोकांची भावना असेल, तर तिथे तुम्ही ती दाबू शकत नाही. आत्ता स्मारकाच्या बाबतीत लोकभावना अशी आहे की मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण झालं पाहिजे. शरद पवारांच्या हस्ते नको. एवढे जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही कशासाठी अट्टाहास धरत आहात ? असा सवाल त्यांनी केला.

काहीही झालं, तरी आज लोकार्पण होणार हे पालकमंत्र्यांना माहिती असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांना आत येऊ दिले जात नाही. तरी कार्यकर्ते इथे आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्मारकाचं लोकार्पण करणार आहे. पालकमंत्र्यांना देखील हे माहित असल्यामुळेच आणि माध्यमांनी ते दाखवू नये, यासाठी माध्यमांना त्याठिकाणी मनाई करण्यात आली आहे, असे पडळकर यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.