पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे विद्यापीठ पुणे मुंबई महामार्ग लगत साते, वडगांव मावळ येथे उभारण्यात आले असून पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून २०२३ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यापीठास मंजुरी दिली. पीसीईटीने स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ मान्यतेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.
पीसीईटी ३२ वर्षांपासून शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य करीत आहे. साते, वडगांव मावळ येथे १० एकर विस्तीर्ण क्षेत्रात हे विद्यापीठ उभारण्यात आले आहे. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया जून २०२३ पासून सुरू होणार आहे.
माजी खासदार कै. शंकरराव बाजीराव पाटील यांनी सुरू केलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.
पीसीईटीच्या शैक्षणिक संस्थां मधून मॅनेजमेंट, अभियांत्रिकी,आर्किटेक्चर, तंत्रनिकेतन, विविध विषयांचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय अशा शैक्षणिक अभ्यासक्रमांची अद्ययावत व्यवस्था आकुर्डी, रावेत, तळेगाव परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण आणि राज्यातील उत्तम कॅम्पस प्लेसमेंट यासाठी सुप्रसिद्ध असलेली संस्था आहे. संशोधनासाठी अध्ययावत प्रयोगशाळा आणि तज्ञ मार्गदर्शक आहेत. संशोधन क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये एक मोठी झेप संस्थेने घेतली असून सुमारे अडीचशे कॉपीराइट्स आणि साडेचारशे पेटंट्स संस्थेने मिळवले आहे. यासाठी ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये या कार्याची दखल घेण्यात आली आहे. पीसीइटीमध्ये डिजिटल क्लासरूम’ वाय-फाय कॅम्पस लायब्ररी, अद्ययावत प्रयोगशाळा, सर्व संगणक प्रणाली, ईआरपी यंत्रणा अशा सुसज्ज शैक्षणिक सुविधा आहेत. त्यासोबत विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठीची स्वतंत्र होस्टेल्स, मेस, दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था या आवश्यक बाबी देखील अनेक वर्षांपासून उपलब्ध आहेत. ‘एआयसीटीई’, ‘डीटीई’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी उच्चस्तरीय यंत्रणांच्या नियंत्रणाखाली शैक्षणिक प्रगती करतानाच ‘एनआयआरएफ’ रँकिंग मध्ये सलग चार वर्षे भारतातील पहिल्या 200 क्रमांकात स्थान, नॅक, एनबीए, आयएसओ अशा नामांकनाच्या वरच्या दर्जाने संस्थांना प्रमाणित करण्यात आले आहे.
आकुर्डी, रावेत, तळेगाव येथील शैक्षणिक संकुलात हजारो विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. येथे केजी ते पीजी पर्यंतचे अभ्यासक्रम शिकवले जातात. अल्पावधीतच पीसीईटीने देशातील अग्रगण्य शिक्षण संस्थांमध्ये नावलौकिक मिळविला आहे. दर्जेदार शिक्षण, उत्तम प्लेसमेंट, शैक्षणिक गुणवत्ता या त्रिसूत्री मुळे संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर २३ विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये यूएसए, रशिया, युके, मलेशिया, थायलंड, इटली, आयर्लंड, जपान, डेन्मार्क, नेदरलँड, व्हिएतनाम इत्यादी देशांमधील विद्यापीठांचा समावेश आहे.
पीसीईटीच्या शैक्षणिक संकुलात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक नोकरी, चांगले आर्थिक वार्षिक पॅकेज देणारी महाराष्ट्रातील संस्था म्हणून पाहिले जाते. २०२१-२२ मध्ये ६१ लाखांचे सर्वाधिक प्लेसमेंट मिळाले आहे.
मागील वर्षी केंद्र सरकारने पीसीईटीला देशातील ‘उत्कृष्ट कॅम्पस’ म्हणून सन्मानित केले. संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देते त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी पालकांकडून प्रथम प्राधान्यक्रम दिला जातो.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव विठ्ठल काळभोर, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई हे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
उत्तम शिक्षणामुळे पंचवीस हजारांहून अधिक विद्यार्थी नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड विद्यापीठास मान्यता दिल्याची घोषणा होताच ट्रस्टने मुख्यमंत्री, उच्च तंत्र शिक्षणमंत्री आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले. या मान्यतेमुळे पीसीईटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे त्यामुळे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.