आयुक्तालयासाठी एक अपर आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त पदांसह बॉम्ब शोधक नाशक पथकाला शासनाची मंजुरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी एक अपर पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक पोलीस आयुक्त या पदांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. तसेच शासनाने आयुक्तालयात बॉम्ब शोधक-नाशक पथकाला (बीडीडीएस) देखील शासनाने मंजुरी दिली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी सध्या एक अपर पोलीस आयुक्तांचे पद मंजूर आहे. आणखी एक अपर पोलीस आयुक्तांचे पद मंजूर करण्यात आले आहे. तर सध्या तीन उपायुक्त कार्यरत आहेत. आणखी दोन पोलीस उपायुक्तांची पदेही नव्याने मंजूर झाली आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात सहायक पोलीस आयुक्तांची आठ पदे मंजूर आहेत. सध्या आठही जण कर्तव्यावर आहेत. मात्र अधिकाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने आणखी चार सहायक आयुक्तांची पदे शासनाकडून मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे आता आयुक्तालयास 12 सहायक आयुक्त मिळणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहराला स्वातंत्र पोलीस आयुक्तालय असले तरी बॉम्ब शोधक व नाशक पथक नाही. बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली आहे.
या पथकामध्ये सध्या दोन टीम 24 तास कार्यान्वित असणार आहे. प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी, स्फोटकाबाबतची माहिती देण्यासाठी अद्यावत साधन सामग्री आणि प्रशिक्षित श्वान पथक यांचा यात समावेश असणार आहे. सध्या पोलीस दलात असलेल्या आणि बॉम्ब शोधक नाशक पथकात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी काळात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.