केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन महाराष्ट्र, पश्चिम बंगाल सरकार पडायचे आहे : संजय राऊत
आजच्या पत्रकार परिषदेतील संपूर्ण मुद्दे वाचा सविस्तर
पिंपरी : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर सडकून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे परिवार आणि अनेक शिवसेनेचे दिग्गज नेते, महाविकास आघाडीतील अनेक नेते यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा ज्यापद्धतीने हल्ले करत आहेत तर मला असं वाटतं तर हे महाराष्ट्रावरच नाही तर देशावरच संकट आहे. पश्चिम बंगालमध्येही तसंच आहे. महाराष्ट्रातील सरकार त्यांना पाडायचं आहे.
पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. काय उखडायचं ते उखडा, बघू कोणात किती दम आहे, असंही ते काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यामुळे हे भाजपाचे साडेतीन लोक कोण? संजय राऊत नक्की कोणते खुलासे करणार ? याकडे सगळ्या महाराष्ट्राचंच लक्ष लागलेलं आहे.
“आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच आहे. महाराष्ट्र गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दांगी करुन आमच्या पाठीमागे वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे परिवार आणि अनेक शिवसेनेचे दिग्गज नेते, महाविकास आघाडीतील अनेक नेते यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा ज्यापद्धतीने हल्ले करत आहेत तर मला असं वाटतं तर हे महाराष्ट्रावरच नाही तर देशावरच संकट आहे. पश्चिम बंगालमध्येही तसंच आहे. महाराष्ट्रातील सरकार त्यांना पाडायचं आहे.
त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव. एकतर तुम्ही सरेंडर व्हा नाहीतर गुडघे टेका अशाप्रकारच्या धमक्या देत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
कितीही नामर्दानगी करून पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही – राऊत
पत्रकार परिषदेची सुरुवात करताना संजय राऊत म्हणाले, “सर्व नेते आजची ही पत्रकार परिषद बघत आहेत. मला शरद पवारांचाही फोन आला. महाविकास आघाडीतला प्रत्येक प्रमुख नेता आमच्या सोबत आहे. ही पत्रकार परिषद हे सांगण्यासाठी आहे की कितीही नामर्दानगी करून तुम्ही पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही.”
हिंमत असेल तर ईडीने माझ्या घरी यावे- राऊत
“ED वाले ऐका , या माझ्या घरी, मी लढणार, जितेंद्र नवलानी कोण आहे ? हे नाव ऐकल्यावर मुंबई आणि दिल्लीतील ED च्या लोकांचा घसा सुकेल.गेले ४ महिने ED च्या नावावर वसुली सुरू आहे, ७० बिल्डरकडून सुरू आहे, हे ED च्या काही अधिकाऱ्यांना माहीत आहे. मी याबाबत मोदी, अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे. अशा ४ एजंटनी ३०० कोटी रुपये वसूल केले आहेत”
किरीट सोमय्यांवर हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप
“पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली”असे ते म्हणाले
किरीट सोमय्या म्हणजे मुलुंडचा दलाल – राऊत
राऊतांनी किरीट सौमय्यांवर टीका केली आहे, ते म्हणाले “ठाकरे परिवाराच्या नावावर १९ बंगले आहेत, असा दावा त्या दलालाने केला आहे, मुलुंडच्या दलालाने. माझं त्याला आव्हान आहे, आपण सगळे मिळून बस करून त्या १९ बंगल्यांवर पिकनिकला जाऊ. मी देतो चाव्या. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन”