मुंबई : भाजप नेते भेटल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. 29 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनासुद्धा पत्र पाठवले आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने वळण घेत असल्याचे दिसत आहे. भाजपकडे असणारी पुरेसे संख्याबळ, शिंदेगटाची बंडखोरी, राजकीय अस्थिरता, राज्यपालांची कारवाई या सगळ्याच बाबतीत टांगती तलवार मविआ सरकारवर असल्याने सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपच्या प्रमुख नेत्यांनी काल रात्री राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली आणि राज्यातील घडामोडींची चक्रे वेगाने फिरू लागली. राज्यपालांनी तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्धीचे पत्र पाठवले, शिवाय विधीमंडळ सचिवांनासुद्धा त्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर पर्याय म्हणून महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीसाठी सामोरे जावे लागणार आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राज्य सरकार चांगलेच संकटात सापडले आहे. बंडावर ठाम असणाऱ्या आमदारांमुळे मविआ सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही त्यामुळे ते लवकरच कोसळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी करून पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर काल रात्री त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकारच्या बहुमत चाचणीचे पत्र दिले.