मणिपूर : मणिपूर मधील हिंसाचार थांबवण्यासाठी सरकारमध्ये हिंमत नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मणिपूरमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले. मणिपूर हिंचारावर त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. मणिपूर जळत असताना मोदी अमेरिकेच्या दौऱ्यात व्यस्त असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला.
मणिपूर हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सर्व पक्षीय बैठक बोलण्यात आली आहे. ही बैठक नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हायला हवी होती, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. असे असले तरी शिवसेनेच्या वतीने खासदार प्रियंका चतुर्वेदी त्रिवेदी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
पाटणा येथे झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या बाजूला बसून त्यांच्याशी चर्चा केली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. आमच्यावर सडकून टीका करण्याआधी स्वतःकडे बघा, असा सल्ला राऊत यांनी दिला. मुफ्ती यांच्यासोबत भाजपने सरकार स्थापन केले होते, नवाब शरीफ यांचा केक कापण्यासाठी आम्ही गेलो नव्हतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
पाटणा येथे झालेल्या बैठकीमध्ये सर्व पक्षांच्या वतीने 2024 मध्ये एकत्र लढण्याचा निर्धार आम्ही केला आहे. तसेच आम्ही आगामी निवडणूक एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2024 मध्ये लोकशाहीतील सर्वात शेवटची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला नाही, तर आगामी काळात भारतात लोकशाही टिकणार नाही, असेही ते म्हणाले.