बनावट कागदपत्राद्वारे जमीन हडपली, दावा मागे घेण्यासाठी पिस्तूलाचा धाक दाखवून, जातीवाचक शिवीगाळ

उद्योजकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

पिंपरी : जमिनीचा विकसन करारनामा करायचा आहे असे सांगून, कोऱ्या कागदावर फोटो लावून, स्वाक्षऱ्या, अंगठे घेऊन, परस्पर जमिनीचे खरेदीखत करुन, फसवणूक करुन, दमदाटी करुन, न्यायालयातील दावा मागे घेण्यासाठी पिस्तूलाचा धाक दाखवून, 60 लाख रुपयांची खंडणी मागून, जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एका उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वसंत धोंडिबा साळुंखे (50, रा. माणगाव, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. तर संतोष अंकुश मोहिते, किशोर अंकुश मोहिते, अंकुश किसन मोहिते, एक चालक, दोन बॉडीगार्ड आणि गाडीतील अनोळखी व्यक्तिविरुद्ध भादवी कलम 364 अ, 143,144,149, 323, 504, 506(2), 406, 420, आर्म ऍक्ट 3,25, अनुसूचित जाती जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989 (सन2015 च्या दुरुस्तीनुसार) कलम 3 (1) (जी) (आर) (एस) (5) (अ) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(2)सह135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ही घटना 3 जानेवारी 2018 ते 10 जुलै 2022 दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी-2 कार्यालय व माण स्मशान भूमीलगत माणगाव येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत साळुंखे आणि त्यांचा भाऊ अरूण यांना माणगाव येथील सर्व्हे नंबर 438/5, 439/1/अ आणि 440/1 यामधील 75 गुंठे जमीनाचा विकसन करारनामा करायचा आहे असे संतोष मोहिते, किशोर मोहिते यांनी सांगितले. त्यासाठी त्यांना घेवून गेले. 3 जानेवारी 2018 रोजी दुय्यम निबंधक कार्यलयात कुलमुखत्यार करुन घेतले.

याला जोडण्यासाठी कागदपत्रे लागत आहेत असे सांगून कोऱ्या कागदावर दोघा साळुंखे भावांचे फोटो लावून, स्वाक्षऱ्या आणि अंगठे घेतले. त्याआधारे 75 गुंठे क्षेत्रातील 20 गुंठे जमीन परस्पर स्वतःचे नावे करुन, कोणताही मोबदला न देता साळुंखे यांची फसवणूक केली.

दरम्यान 10 जुलै 2022 रोजी गावातील रामदास मोहिते यांची मयत झाल्याने अत्यंविधी करून साळुंखे हे रात्री घरी येत होते. त्यावेळी संतोष मोहिते व त्याच्या इतर साथीदारांनी साळुंखे यांना अडवून दिवाणी न्यायालयात असलेला दावा मागे घेण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने गाडीत बसण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिला. त्यावेळी साळुंखे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन जाळून टाकण्याची धमकी दिली. तसेच मोहितेच्या बॉडीगार्डने साळुंखे यांच्या डोक्याला पिस्तुल लावून गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेले.

त्या ठिकाणी शिवीगाळ करुन तुझ्यामुळे माझे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे त्यामुळे तू मला 60 लाख रुपये दे अशी खंडणी मागितली. तसेच पैसे नाही दिले तर तुला ठार मारुन टाकेन अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.