पुणे, दि. १४ – भोर तालुक्यात आत्तापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा दोन हजाराचा पार गेला असून कोरोना सारख्या संकटाच्या काळात पारवडीमध्ये विशेष ग्रामसभा लावण्यात आली आहे. एका विशिष्ट वादग्रस्त विषयावरून ग्रामसभा होणार असल्याने मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याने कोरोना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार का? असा सवाल होत आहे.
भोर तालुक्यात कोरोना काळात एकाही ग्रामपंचायतची ग्रामसभा झाल्याचे ऐकिवात नाही. विशेष म्हणजे शासनाकडून नाट्यग्रह, सिनेमा तसेच विवाह सोहळेसाठी केवळ पन्नास लोकांची मर्यादा ठेवण्यात आली. मात्र अशातच पारवडीमध्ये होणाऱ्या ग्रामसभेला परवानगी दिलीच कशी असा सवाल होत असून एका विशेष मुद्द्यावरून दि. १६ होणाऱ्या ग्रामसभेला एकमेकांविरुद्ध मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याचे समजते. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढणार येणार आहे.
गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी बोलताना सांगितले की, ग्रामसभा घेण्याचा अधिकार हा ग्रामपंचायती पातळीवर होत असतो. मात्र ग्रामसभेमुळे विपरीत होणाऱ्या परिणामाला संबधित जबाबदार राहतील. त्यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल. तर तहसिलदार अजित पाटील यांनी बोलताना सांगितले की, याबाबत अद्याप मला काहीही माहीत नसून माहिती घेणार असल्याचे सांगितले.