पुणे : सर्वसामान्यांसाठी ‘सरकारी नोकरी’ हा जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. सरकारी नोकरी हवी म्हणून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी पाहायला मिळते, परंतु दरवेळी अशी संधी चालून येईल असे नाही. अशातच पुणे महापालिकेकडून लवकरच मेगा भरती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लिपिक अभियंता, अग्निशमन दल, आरोग्य व्यवस्थापन विभागांसह इतरही विभागातील पदांच्या सुमारे पाचशे जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात पुढच्या आठवड्यात जाहिरात काढली जाणार आहे.
पुणे महापालिकेकडून विविध पदांसाठी सुमारे पाचशे जागांसाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. येणाऱ्या अर्जसंख्येनुसार संपुर्ण राज्यात या भरतीप्रक्रियेसाठी परीक्षा केंद्रांचे आयोजन केले जाणार असून केंद्र सरकारच्या आयपीबीएस कंपनीतर्फे सदर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली आहे.
दरम्यान, 500 पदांच्या भरती ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे, त्यामुळे येणाऱ्या अर्जसंख्येनुसार परीक्षाकेंद्रांचे नियमन केले जाणार आहे. नागपूर, औरंगाबाद, मुंबई या शहरांबरोबर इतरही शहरांत परीक्षा केंद्रे करावी लागण्याची शक्यता आहे. 500 परीक्षा केंद्रे तयार करावी लागतील, असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी यावेळी सांगितले.