पालकमंत्री चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : तीन पोलीस अधिकारी, सात कर्मचारी निलंबित

0

पिंपरी : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे समाजात तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. शनिवारी पुणे दौऱ्यावर असताना पिंपरी- चिंचवड येथील कार्यक्रमात भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस अधिकारी आणि सात पोलीस कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करण्यात आलेले आहे.

चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. ते पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी समता दल संघटक मनोज भास्कर घरबडे (34, रा. पत्राशेड, पिंपरी), धनंजय भाऊसाहेब इजगज (29, रा. आनंदनगर, चिंचवड) आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओव्हाळ (40, रा. आनंदनगर, चिंचवड) या तिघांना अटक केली आहे.

कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी तत्काळ कारवाई केलेली आहे. यामध्ये गुन्हे शाखेचे एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, दोन सहायक उपनिरीक्षक आणि इतर कर्मचारी यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.