नवी दिल्ली : आयपीएल-16 चा 7 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) दिल्ली कॅपिटल्सवर 6 गड्यांनी मात केली. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात दिल्लीने दिलेले 163 धावांचे आव्हान गुजरातने 18.1 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 62 धावा केल्या. त्याला विजय शंकर (29 धावा) आणि डेव्हिड मिलरने (31 धावा) चांगली साथ दिली. गुजरातचे शुभमन गिल, वृद्धिमान साहा आणि हार्दिक पंड्या हे तिघेही सुरुवातीला स्वस्तात आऊट झाले होते. त्यानंतर साई सुदर्शन व विजय शंकरने गुजरातचा डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र मिचेल मार्चने ही जोडी फोडत विजयला पायचित केले.
शमी-राशीद वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि रशीद खान यांनी शानदार गोलंदाजी करत दिल्लीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. नवीन चेंडूसह शमीने पृथ्वी शॉ (7 धावा) आणि मिचेल मार्श (4 धावा) यांना स्वस्तात पॅव्हेलियन परतवले. त्यानंतर अल्झारी जोसेफने कर्णधार वॉर्नरला (37 धावा) मोठी खेळी खेळू दिली नाही. मधल्या फळीत जोसेफसह राशीद खानने मोठी भागीदारी होऊ दिली नाही. त्यांनी मधल्या षटकांमध्ये तीन बळी घेतले. त्यानंतर शमीने पॉवर हिटर अक्षरला बाद केले.
साई सुदर्शनने क्रमांक-3 वर खेळायला येत 48 चेंडूत नाबाद 62 धावांची संयमी खेळी केली. या युवा फलंदाजाने संघाची पडझड रोखली आणि शेवटी सामनाही संपवला. एका टप्प्यावर संघाने 54 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. सुदर्शनने विजय शंकरसोबत 44 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. त्यानंतर निर्णायक प्रसंगी डेव्हिड मिलरच्या साथीने 29 चेंडूंत नाबाद 56 धावा केल्या.
डेव्हिड मिलर – दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरने वेगवान धावा केल्या. निर्णायक वळणावर विजय शंकरची विकेट गमावल्यानंतर मिलरने 16 चेंडूत 31 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.
दुसऱ्या डावातील पॉवर प्लेदरम्यान दोन्ही संघांत कडवी झुंज बघायला मिळाली. पॉवर प्लेमध्ये गुजरातच्या फलंदाजांनी 54 धावा केल्या. तर दिल्लीच्या गोलंदाजांनी गुजरातला तीन झटके दिले. कर्णधार पंड्या 5, शुभमन गिल व वृद्धिमान साहा 14-14 धावा करून आऊट झाले. एनरिक नोर्त्यान 2 आणि खलील अहमदने 1 विकेट घेतली.