पिंपरी : जगताप डेअरी, विशालनगर येथील एका गोदामावर छापा टाकून तब्बल 11 लाख 27 हजार 646 रुपये किमतीचा गुटख्याचा साठा व अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. शनिवारी सकाळी पावणे सात वाजता ही कारवाई करण्यात आली.
अशोक नाराराम चौधरी (45, रा. विशालनगर, जगताप डेअरी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशानुसार सामाजिक सुरक्षा पथकाकडून शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरु आहे. आज, शनिवारी पहाटे 4 वाजता विशालनगर येथील एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.
त्यानुसार या पथकाने विशाल नगर येथील अशोक चौधरी याच्यागोदामावर छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा केला असल्याचे पथकाच्या निर्दशनास आले.
या कारवाईत पोलिसांनी 25 लाख 43 हजार रुपये किमतीचा रसिकालाल माणिकचंद आरएमडी पान मसाला, 2 लाख 68 हजार रुपये किमतीचा रसिकालाल माणिकचंद आरएमडी तंबाखू मसाला, 58 हजार 344 रुपये किमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला, 48 हजार 960 रुपये किमतीचा केशरयुक्त पान मसाला, 10 हजार 296 रुपये किमतीची तंबाखू, 12 हजार 480 रुपये किमतीची वि-1तंबाखू, 3 हजार 96 रुपयांचा रजनीगंधा सुगंधित पान मसाला, साडे सहा हजारांची गोवा 1000चे पाकिटे, 4 लाख 10 हजारांची मारुती सुझकी कंपनीची कार, पाच हजारांचा मोबाईल आणि 1770 रुपयांची रोकड, असा एकूण 11 लाख 27 हजार 646 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.