पिंपरी : वाकड, थेरगाव येथे युट्यूबवर शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीलाही मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी पीडित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली. तर ऋषिकेश सावंत ( ४०, रा. थेरगाव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला यूट्यूब चॅनलवर शॉर्ट फिल्म बनवते. थेरगाव येथे कावेरी नगर पुलाजवळ सेवा रस्त्यावर वाहनांचा खोळंबा झाला होता. त्यावेळी महिला व त्यांचे पती तेथून जात होते. त्याच वेळी सावंत देखील त्याच्या चारचाकी वाहनातून तेथे आला. गाडी काढा, असे तो हात करून म्हणाला. महिलेने ‘थांबा’, असा हाताने इशारा केला.
या कारणावरून सावंतने महिलेला शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या पतीला गाडीवरून ओढून खाली पाडले. त्यानंतर हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. त्यानंतर पतीलाही धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे तपास करीत आहेत.