पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची १०० कोटींपेक्षा अधिक बेनामी संपत्ती असून त्याची माहिती आयकर विभागाला दिली असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यांनी पुण्यात आयकर विभागाला कागदपत्रे सादर केल्यानंतर हसन मुश्रीफ यांची बेनामी संपत्ती जप्त करा, अशी मागणी केली आहे.
हा सर्व काळा पैसा कोणत्या माध्यमातून गोळा केला गेला याची चौकशी करावी, त्यांच्या बेनामी संपत्तींची यादी आयटीला दिली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली. जोवर कारवाई होत नाही, तोवर पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुण्यातील आयकर भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. किरीट सोमय्या हाय हाय च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. अर्जुन गांजे आणि दिनेश खराडे या सामजिक न्याय विभागाच्या दोन कार्यकर्त्याना घेतलं पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी लुटीचा माल सरकारी तिजोरीत जमा करावा अशी मागणी केली आहे. मुश्रीफ यांनी संजय राऊत यांच्याकडून शिकावे.राऊत यांनी पहिला हप्ता म्हणून ५५ लाख रुपये ईडीकडे भरले आहेत, मुश्रीफ यांनी देखील जनतेचा पैसा परत करावा अन्यथा आम्ही पाठपुरावा करत राहणार असल्याचे सोमय्या म्हणाले.