पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीचे वारे वाहत आहे. यामुळे शहरातील वातावरण बदल असून वाकड परिसर खूपच गरम झाल्याचे दिसत आहे. वाकड परिसरात सध्या लावण्यात आलेल्या ‘हटके फ्लेक्स’ची चर्चा आहे. यापूर्वीही असे फ्लेक्स झळकले होते.
भुजबळ चौक, भूमकर वस्ती, वाकड येथील हिंजवडी कडे जाणा-या उड्डाण पूलाच्या संरक्षक भिंतीवर हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ‘आम्हाला नवीन प्रसूतीगृह बांधून देणारा नवीन नगरसेवक हवा आहे, होय मी गरीब महिला बोलतेय.’ ‘चिल्ड्रन्स पार्क बांधून देणारा नगरसेवक हवा, होय मी लहान मुलगा बोलतोय.’ ‘नवीन प्ले ग्राऊंड बांधून देणारा नगरसेवक हवा, होय मी खेळाडू बोलतोय.’ असा मजकूर या फ्लेक्स वरती छापण्यात आला आहे.
फ्लेक्सच्या माध्यमातून नवीन गार्डन, नाना नानी पार्क, फुटपाथ, प्रेक्षागृह असे विषय मांडण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर लावण्यात आलेले हे फ्लेक्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, अशा प्रकारे उभारण्यात आलेले हे फ्लेक्स कुणी लावले आहेत याबाबत माहिती मिळू शकली नाही.