मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा द्वेष राज ठाकरे यांच्या मनात : राऊत

0

रत्नागिरी : मशिदीवरील भोंग्या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. यातच आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रत्नागिरीत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, “स्वत:चा भाऊ मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर बसला आहे हे पहावत नसल्यानेच राज ठाकरेंचा थयथयाट सुरू आहे. केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांचा द्वेष राज ठाकरे यांच्या मनात भिनला आहे. राज ठाकरेंची करमणूक करण्याची पद्धत जुनी आहे. प्रत्येक निवडणुकीला सुपारी घ्यायचं काम ते करत असतात. भोंगा हा देशपातळीवरचा विषय असून याबाबत नियंत्रण आणायचं असेल तर केंद्रानं कायदा करावा,” असं ते म्हणाले.

पुढे विनायक राऊत म्हणाले, ”केवळ महाराष्ट्रात अतिक्रमण झालंय असं दाखवून महाविकास आघाडीला आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रकार दुष्ट आणि कपट नितीनं भाजपाची सुपारी घेऊन राज ठाकरेंनी सुरू केला आहे. तर, भोंग्यांचा विषय घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांना त्रास देण्यासाठीच हा प्रश्न उचलला गेला असल्याचं,” राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.