पुणे : रस्त्यावर भाजी विक्री करताना जोरजोरात ओरडून मोठा आवाज केला म्हणून झालेल्या वादातून १५ ते २० जणांच्या टोळक्याने भाजीविक्रेत्यांवर हल्ला केला. आरोपींनी भाजीविक्रेत्यांच्या पोटात चाकूने पोटात भोसकल्याने ते गंभीर जखमी झाला आहे.
फरासखाना पोलिसांनी या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली. वाजीद बशीर शेख (वय 35, रा. 715, सरोज अपार्टमेंट, नाना पेठ ), शब्बीर इक्बाल टिनवाला (वय 30), इस्माईल शब्बीर पुनावाला (वय 35), तरबेज इब्राहिम शेख (वय 36),तरबेज इब्राहिम शेख (वय ३६) आणि अल्लाउद्दीन इमामुद्दीन शेख (वय 40, चौघे रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्यासह आणखी 18 जणांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिरुद्ध इनामदार (वय 20, रा. रविवार पेठ रा. 650, रविवार पेठ, काची आळी) यांनी फिर्याद दिली.
पोटात चाकू लागल्याने देवांग सचिन कंट्रोल्लू (वय 19, रा. काची आळी) हा जखमी झाला असून त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवार पेठेत मंगळवारी (ता. १) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
अटक केलेल्या आरोपीकडे तपास करीत गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करायची आहे. गुन्ह्यात वापरलेला चाकू तसेच मारहाण करण्यासाठी वापरलेले इतर साहित्य जप्त करण्यासाठी, पोलिसांसमोर भाजीविक्रेत्यांना मारहाण झाली असून त्यामागचे नेमके काय कारण आहे? याचा शोध घेण्यासाठी अटक केलेल्या 5 ही आरोपीस 7 दिवसाची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली. न्यायालयाने त्यांना 7 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.