मैत्रिणीसाठी तो करत होता महागड्या दुचाकींची चोरी

0

पुणे: मैत्रिणीला फिरवण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सौरभ दत्तात्रय चोरगे (२०, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्या तरुणाचा नाव आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून गस्त सुरू होती. त्यावेळी पोलिस हवालदार कुंदन शिंदे व सागर सुतकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की एक तरुण चोरीची दुचाकी घेऊन शिवदर्शन परिसरातील वसंतराव बागुल उद्यान कमानीपासून पुढे असलेल्या पुलावर थांबला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक स्वप्निल लोहार यांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्यावेळी त्याने त्याचे नाव चोरगे असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली. त्यावेळी ती दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने दत्तवाडी व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.