नवी दिल्ली : देशासह राज्यात सर्वच ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरवात झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, तसेच पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने खबरदारी म्हणून आतापासूनच पावले उचलण्यास सुरवात केली असून नवे नियम जारी केले आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आहे. ऑफिसमध्ये एक किंवा दोन प्रकरणे (कोविड केसेस) आढळून आल्या, तर संबंधित व्यक्तीने गेल्या ४८ तासांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी भेट दिली आहे, अशा सर्व जागांचे निर्जंतुकीकरण करावे, आणि त्यानंतरच नियमावलीनुसार ऑफिस कामांना सुरवात करावी, असे शनिवारी (ता.१३) प्रसिद्ध करण्यात आलेल्या एसओपी मध्ये नमूद करण्यात आले आहे.
जर कामाच्या ठिकाणी मोठ्या संख्येत कोविड-१९ प्रकरणे आढळून आल्यास संपूर्ण ब्लॉक किंवा इमारतीचे निर्जंतुकीकरण होईपर्यंत काम सुरू करू नये. कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुपरवायझर अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी आणि त्यानंतर पुढील सूचना मिळेपर्यंत ऑफिसमध्ये हजर राहू नये. अशा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्यात यावी.
वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळता कंटेन्मेंट झोनमधील सर्व ऑफिस बंद राहतील. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या परिसरातील कर्मचाऱ्यांना प्रवेश द्यावा, तसेच दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे. तसेच मास्क वापरणे आवश्यक आहे.
संबंधित व्यक्तींनी नाक आणि तोंड योग्यरित्या झाकले जाईल, अशा प्रकारचे मास्क वापरावेत. तसेच वारंवार मास्क किंवा चेहऱ्याला स्पर्श करू नये. तसेच कमीतकमी ४० ते ६० सेकंद हात साबणाने स्वच्छ धुवावेत. जेथे शक्य असेल तेथे अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करावा. शक्य तेवढ्या मीटिग्ज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्याव्यात. तसेच जास्त संख्येत लोक जमतील अशा प्रकारचे कार्यक्रम टाळावेत.
ज्या ऑफिस परिसरात कॉरिडॉर्स, लिफ्ट, इलेव्हेटर्स, पार्किंग, कॅफे, कॅन्टीन्स, कॉन्फरन्स हॉल यांसारख्या जागा आहेत, अशा ठिकाणी कोविड-१९ वेगाने पसरतो. कोरोनाला वेळीच आळा घालण्यासाठी आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर आणि परिणामकारक पावले उचलणे गरजेचे आहे. ऑफिसच्या प्रवेशद्वारांवरच सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य आहे.
ऑफिस दिवसातून कमीत कमी दोनवेळा स्वच्छ करावे.
लिफ्टमध्ये लोकांची संख्या मर्यादित राहील आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील, अशा प्रकारे नियोजन करावे. वेंटिलेशनसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. ऑफिसमधील एसीचे तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवावे. तसेच सापेक्ष आर्द्रता ४०-७० दरम्यान असावी. ऑफिसमध्ये ताजी आणि खेळती हवा राहील, यादृष्टीने प्रयत्न करावेत.
– दरवाज्याची कडी, लिफ्टची बटणे, बेंच, वॉशरूम अशा ठिकाणी १ टक्के सोडीयम हायपोक्लोराइट वापरून साफसफाई करणे आवश्यक आहे.
ऑफिसबाहेर गेल्यावरही दुकान, स्टॉल्स, कॅफे किंवा कॅन्टीन अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले पाहिजे. कर्मचाऱ्यांनी त्यांचे तापमान नियमितपणे तपासावे, तसेच श्वसनासंबंधी लक्षणांची तपासणी करावी. जर त्यांना बरे वाटत नसले, फ्लूसारखी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या व्यतिरिक्त कर्मचारी आणि वेटर्स यांनी मास्क, हँडग्लोव्ह्ज आणि आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी ६ फूट अंतर राहील, अशी बैठकव्यवस्था करावी, असे नव्या एसओपीमध्ये नमूद करण्यात आले आहे.