मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. संख्याबळ कमी असणाऱ्या मविआ सरकारने यावर पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. बहुमत चाचणी विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज (दि. 29 जून) संध्याकाळी 05 वाजता सुप्रीम कोर्टकडून तातडीने सुनावणी करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने तातडीने सुनावणी घ्यावी असा युक्तीवाद शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपालांची भेट घेतली आणि सरकारच्या बहुमत चाचणीचे पत्र दिले. त्यानुसार राज्यपालांनी राज्याची विस्कळीत परिस्थिती पाहता त्यावर सविस्तर पत्र काढून मुख्यमंत्री ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याबाबतचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर उद्या विशेष अधिवेशन बोलवले असून यामध्ये शिरगणती द्वारे मविआ सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राज्यपालांच्या या पत्रानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीमुळे मविआ सरकार पुरते अडचणीत आले आहे. अपुऱ्या संख्याबळाअभावी सरकार कोसळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सरकारने तोंड देण्याचे ठरविले आहे.
बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात शिवसेनेने सरळ सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी राज्यपालांच्या निर्देशांविरोधात याचिका दाखल केली आहे. सुनिल प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद करत सुप्रीम कोर्टने यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती केली आहे.