लोणावळा : संपुर्ण जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात मात्र सुरवातीपासूनच जोरदार हजेरी लावली असून 5 जुलै सकाळी 7 वाजल्या पासून ते 6 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लोणावळा शहरात तब्बल 166 मिमी (6.54 इंच) पावसाची नोंद झाली. आजून देखील पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. असे असले तरीही मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आज अखेरपर्यत 471 मिमी पाऊस कमी झाला आहे.
यावर्षी पावसाळा लवकर सुरुवात होणार असे भाकित करण्यात आले होते, प्रत्यक्षात मात्र पावसाने ओढ दिल्याने लोणावळा शहरातील ओढे नाले अद्याप वहायला सुरुवात झालेली न्हवती. धरणांमधील पाणीसाठा देखील तळालाच आहे. मात्र पावसानं आता दमदार हजेरी लावायला सुरुवात केल्याने पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोणावळा शहरात आज अखेरपर्यंत यावर्षीचा 581 मिमी (22.87 इंच) इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी आजपर्यंत 1105 मिमी (43.50 इंच) पाऊस झाला होता. लोणावळ्यात पावसाला आता जोर मिळाला असून नागरिकांना व पर्यटकांना अशाच जोरदार पावसाची अपेक्षा होती.