पुणे : राज्यात आगामी चार दिवस धो धो पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी आणि बुधवारी कोल्हापूर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ (अतिमुसळधार) पुकारण्यात आला आहे. उर्वरित राज्यातील बहुतांश भागाला गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, जळगावात 11 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला. सोलापुरात ओढ्यात वाहून जाणार्या मुलाचे प्राण वाचविले. चंद्रपूरमध्ये पुरात कार वाहून गेली.
जालना शहरात कुट्टी मशिनमध्ये वीजप्रवाह उतरल्याने तरुणाचा मृत्यू झाला. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात चक्रीय वार्याची स्थिती तसेच ओडिशा व आंध— प्रदेश किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आगामी चारही दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार आहे. मंगळवारी व बुधवारी पावसाचा जोर अधिक राहील. गुरुवारपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे.
आगामी चार दिवस महाराष्ट्र आणि गुजरातला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच ओडिशा, आंध— प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांतही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग, वाशिम, चिखली, खामगाव, नांदेड या जिल्ह्यांत रविवारी जणू प्रलयच आला. गोदावरीच्या पात्रामुळे नांदेड शहरात पाणीच पाणी साचले असून गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. शहरात रस्त्यांवर पुरासारखे पाणी वाहू लागल्याने एक कार वाहून गेली. सिंधुदुर्ग, वाशिम, चिखली, वैभववाडी, मंगळूर पीर, औरंगाबाद या भागांत जोरदार पाऊस रविवारी झाला. सोसाट्याच्या वार्यासह विजांच्या कडकडाटामुळे अनेक शहरांत मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळली.
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात अलर्ट देण्यात आलेला आहे.