पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप आणि कर्नाटक किनारपट्टी परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कडकडाटासह जोरादर पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आज सकाळपासून मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, घाट परिसर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही तासांत संबंदित जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (दि.5) सायंकाळी राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. राज्यातील सांगली, सातारा, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
नाशिक शहराला काल मुसळधार पावसानं झोडपलं आहे. काल मध्यरात्रीर्पयंत शहरामध्ये 31.8 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर मान्सून हंगाम संपल्यानंतर शहरात तब्बल 71.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासात याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
उद्यापासून म्हणजेच रविवार (दि.7) पासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. रविवारी राज्यातील कोल्हापूर रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय रविवारी पुणे रायगड, सांगली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.