मुंबई ः पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगित सुरक्षा दलाच्या म्हणजेच सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्यावर सोपविण्यात आला आहे.
यासंबंधीचे आदेश राज्य गृह विभागानं आज काढले आहेत. हेमंत नगराळे न्यायिक आणि तांत्रिक विभागात महासंचालक होते. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून सुबोध कुमार जयस्वाल कार्यमुक्त करण्यात आले आहे.
हेमंत नगराळे १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मागील काही दिवसांपासून हेमंत नगराळे, कुमार पांडे आणि रजनीश शेठ यांची नावे महासंचालक पदाच्या चर्चेत होती. शेवटी आज गृह विभागाकडून पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्यावर सोपविण्यात आला.