‘त्या’ आमदारावरील हनी ट्रॅपचे षडयंत्र उघडकीस

0

सातारा : पुणे जिल्ह्यातील एका आमदारास बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेले हनी ट्रॅपचे षडयंत्र साताऱ्यात उघडकीस आले. विशेष म्हणजे एका युवतीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयुर साहेबराव मोहिते-पाटील (वय ३५, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे
आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून बदनामीच्या भितीने त्यांच्याकडून लाखो रूपयांची माया गोळा करण्याचा डाव आखला होता. त्या बदल्यात त्या युवतीला काही रक्कम संशयितांनी दिली होती. मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भांडाफोड करून हे प्रकरण उघडकीस आणले.

साताऱ्यातील त्या युवतीने मयुर यांना फोन करून या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने सातारा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवतीकडे चौकशी केली असता, हा सगळा प्रकार समोर आला. त्या युवतीने चौकशीत दिलेली माहिती अशी की, साताऱ्यात राहणारा सोमनाथ शेडगे हा तिचा मित्र असून त्याच्या ओळखीने शैलेश मोहिते व राहुल कांडगे हे दोघे दि.१२ एप्रिल रोजी साताऱ्यात संबंधित युवतीला भेटण्यासाठी आले.

त्यांनी तिला आपल्याला आमदार मोहिते पाटील यांची बदनामी करायची असून त्यासाठी तुझी मदत पाहिजे असल्याचे सांगितले. त्याबद्‌ल्यात संशयितांनी त्या युवतीला काही रोख रक्कम व पुण्यात एक फ्लॅट देण्याचे कबुल केले. त्यासाठी तुला त्यांच्याकडे नोकरीच्या बहाण्याने जायचे असून त्यानंतर त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांची बदनामी करावी लागेल, असा प्लॅन संशयितांनी युवतीला सांगितला. त्याबदल्यात तीला वेळोवेळी एकूण ९० हजार रूपये देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.