पिंपरी : हनी ट्रॅपमध्ये अडकवून तरुणाकडे २० लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. सविता सूर्यवंशी असे या महिलेचे नाव असून, खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. महिला आणि तक्रारदार तरुणाची ओळख एका रुग्णालयात झाली होती. आरोपी महिला एका नामांकीत रुग्णालयात परिचारिका असून तक्रारदार तरूण त्या ठिकाणी काही दिवस उपचार घेत होता. तेव्हा त्याची तिथे ओळख झाली. अशी माहिती वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सविता या पिंपळे सौदागर येथील एका रुग्णालयात परिचारिका आहेत. त्याच रुग्णालयात काही दिवसांपूर्वी तक्रारदार तरूण उपचार घेत होता. तिथं त्यांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले, त्यांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. तक्रारदार तरूणाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर त्या दोघांमध्ये फोनवरून बोलणं व्हायचं तर कधी समक्ष भेटायचे. असे काही वेळा झाले…बहुतांश वेळा ते व्हॉटस अॅपद्वारे चॅटिंग करत असत.
दरम्यान, अचानक सविताने तक्रारदारास पैशांसाठी धमकावणे सुरू केलं. तुमचं माझ्यासोबतचं व्हॉटसऍप चॅट घरातील व्यक्ती आणि इतरांना दाखवेल आणि पोलिसात तक्रार देईल अस म्हटलं. तू मुलींना फसवतो असे म्हणून सोशल मीडियात बदनामी करेल, मी स्वतः आत्महत्या करेल आणि त्या प्रकरणात तुला फसवेल अशी धमकी तक्रारदार तरुणाला देऊन २० लाखांची खंडणी सविताने मागितली. दरम्यान, तेव्हा तरुणाने भीतीपोटी काही रक्कम दिली. मात्र, पुन्हा सविता पैशांची मागणी करत होती. तिला २० लाख रुपये हवे होते.
यामुळे तरुण घाबरला होता, त्याने थेट वाकड पोलीस ठाणे गाठत तक्रार अर्ज दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या तरुणाला यातून सुटका करायची असे पोलिसांनी ठरवलं. पोलिसांनी एक प्लॅन तयार केला. सविताला एका हॉटेलमध्ये २० लाख घेण्यासाठी बोलावले. सविताला देण्यात येणाऱ्या बॅगेत खरे २४ हजार ठेवण्यात आले अन खाली कागद ठेवण्यात आले. सापळा रचून तयार असलेल्या पोलिसांनी, तरुणाने सविताच्या हातात बॅग देताच तिला ताब्यात घेतलं. या घटने प्रकरणी सविताला बेड्या ठोकण्यात आल्या असून ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.