पुणे : मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर कारने कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून त्यात ५ जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. कारमधील अन्य ४ जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. कारचालक जखमी असून तो वेगवेगळ्या ठिकाणी राहणार्या लोकांना घेऊन मुंबईला चालला होता.
पुण्याहून मुंबईकडे जाणार्या एर्टिगा कारने रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी खोपोलीजवळील ढेकू गावाजवळ पुढे जाणार्या एका कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. दरवाजा तुटल्याने आतील प्रवासी बाहेर उडून पडले. त्यात चार जणांचा जागीच मृत्यु झाला.
या अपघाताची माहिती मिळताच आर आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी वाहनांतील लोकांना बाहेर काढून त्वरीत रुग्णालयात पाठविले.
अब्दुल रहमान खान (३२, रा. घाटकोपर), अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी (रा. राजापूर, जि. रत्नागिरी),
राहुल कुमार पांडे (३०, रा. नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गांडेकर (२३, रा. अंधेरी, मुंबई) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.
कारचालक मच्छिंद्र आंबोरे (३८, रा. पिंपरी चिंचवड), अमीरउल्ला चौधरी, दीपक खैराल हे जखमी झाले असून अस्फीया रईस चौधरी (२५, रा. कुर्ला, मुंबई) हे किरकोळ जखमी झाले आहेत.