भीषण आगीत महामार्गावरील हॉटेल कांचन व्हेज जळून खाक

0

यवत : पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या यवत येथील कांचन व्हेज या हॉटेलला आज दुपारी अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. हॉटेलच्या छपराला बंबूच्या चटया व गवताच्या साहय्याने सजावट केलेली असल्याने आगीने क्षणार्धात उग्र रूप धारण केले. त्यामुळे हॉ़टेलमधील फर्निचर व इतर वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या.

कांचन व्हेज हे पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेले प्रसिद्ध हॉटेल आहे. विवेक व प्रसाद कांचन या बंधूंनी पंधरा वीस वर्षांपूर्वी आपल्या शेताच्या बांधावर द्राक्ष विक्रीने व्यावसायास सुरूवात केली. ग्राहकांच्या मागणीनुसार पुढे स्नॅक्स सेंटर व नंतर त्याचे रूपांतर कांचन व्हेज या हॉटेलमध्ये झाले. व्यवसाय करण्याच्या शिस्तबद्ध पद्धतीने अल्पावधीत या हॉटेलचा व्यवसायात चांगला जम बसला होता. आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत या हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.

आग लागल्याचे समजताच यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. येथील दत्त ट्रन्सपोर्टचे मालक संदिप दोरगे यांनी त्वरीत पाण्याचे दोन टॅंकर पाचारण केले. कुरकुंभ येथील महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाचा बंब व अग्निशमन पथक आर्धा- पाऊन तासात घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग काही मिनीटांत आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते.

शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज पोलीस वर्तवत आहेत. तर स्थानिक नागरीकांच्या मते हॉटेलच्या भटारखान्यातील गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे आग लागली असावी. य़वतचे ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे, गाव कामगार तलाठी कैलास भाटे हे ही घटनास्थळी उपस्थीत होते. हॉटेलचे कामगार व स्थानिक नागरीकांनी भटारखान्यातील गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला.

Leave A Reply

Your email address will not be published.