काॅंग्रेसचे नेते कधीपर्यंत अपमान सहन करणार ः राम कदम

0

मुंबई : महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केंद्राने तयार केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन चिकाटीने सुरू ठेवले आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षावर म्हणावा असा दबाव टाकण्यात विरोध पक्ष कमी पडतो आहे. सरकारवर तुटून पडण्यात विरोधी पक्ष कमजोर आहे, असे शिवसेनेने काॅंग्रेसबद्दलची भूमिका सामनाच्या अग्रलेखात मांडली, हाच मुद्दा पकडत भाजपाचे नेते राम कदम यांनी काॅंग्रेसच्या स्वाभिमानाचा प्रश्न उपस्थित केला आहे.

“आजच्या सामनाच्या अग्रलेखात देशातील विरोधी पक्षावर टीका करण्यात आली आहे. सध्याचा घडीला विरोधी पक्षातील नेते कमकुवत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर विखुरलेले आहेत. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे. दुसरीकडे मात्र, देशभरात केवळ राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे नेते शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. केवळ शरद पवार सक्रिय आहेत आणि बाकीचे नेते निष्क्रिय झाले असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत आहे. सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार?”, असा प्रश्न भाजपाचे नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

काय मांडले आहे अग्रलेखात…

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत दिल्लीतील सत्ताधारी कमालीचे बेफिकीर आहेत. सरकारच्या या बेफिकिरीचे कारण देशातील विस्कळीत, कमजोर झालेला विरोधी पक्ष आहे. निपचित पडलेल्या विरोधी पक्षाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही. राहुल गांधींच्या विधानांना काँग्रेसही गांभीर्याने घेत नाही, असे कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले. आपल्या सर्वोच्च नेत्यांची अशी जाहीर चेष्टा करण्याचे धारिष्ट सत्ताधारी का दाखवतात? यावर काँग्रेसने वर्किंग कमिटीत चर्चा करणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्री तोमर यांनाही देशातील शेतकरी गांभीर्याने घेत नाही ही वस्तुस्थिती आहेच. मात्र तरीही सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे, हा आक्षेप उरतोच. असे मत सामना अग्रलेखातून काॅंग्रेसने मांडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.