“आणखी किती जणांना पदावरून हटवणार?”

0

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतंच शिवसेनेने लोकसभेतील मुख्य प्रतोद पदावरून खासदार भावना गवळी यांची हकालपट्टी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. शिवसेना अशाप्रकारे किती जणांना पदावरून हटवणार आहे? कितीजणांची पक्षातून हकालपट्टी करणार आहे?, असे शिंदे यांनी विचारले आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर आता उद्धव ठाकरे काय उत्तर देणार? हे पाहावे लागेल.

गेल्या काही दिवसांपुर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे बारा खासदार फुटणार असल्याची चर्चा सातत्याने रंगली आहे. यात भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून हटवले. त्यांच्या जागी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या दरम्यान, मुंबईतील शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षाविरोधात जाणारा विचार बोलून दाखवला होता. राहुल शेवाळे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्यात भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती शेवाळे यांनी केली होती. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील काल (बुधवारी) शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदारही फुटतील, अशी दाट शक्यता वर्तविली जातेय. तसे घडल्यास शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याचा एकनाथ शिंदे गटाच्या दाव्याला आणखी बळकटी मिळणे साहजिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.