पुणे : निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर यांच्याकडे तब्बल ८२ कोटी ३४ लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता आहे. तसेच त्यांचे व कुटुंबीयांच्या नावे व भागीदारी असलेल्या ३७ कंपन्या असल्याचे समोर आले आहे.
भ्रष्टाचारातून संपादित केलेला पैसा वापरत नाझीरकर यांनी त्यांचे सासरे गुलाब दिना धावडे यांच्या नावाने मालमत्ता घेतल्या आहेत. तसेच विविध भागीदारी संस्थांमध्ये गुंतवणूक केली. त्यानंतर सासरे धावडे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे बनावट मृत्युपत्र तयार करून सर्व मालमत्ता व कंपन्या या त्यांची पत्नी संगीता नाझीरकर यांच्या नावाने वर्ग केल्या आहेत.
नाझीरकर यांनी सार-याचे नावे ३५ आणि स्वतः व पत्नीच्या नावाने १७ स्थावर मालमत्ता खरेदी केल्या आहेत. नाझीरकर यांना २४ मार्च रोजी पुणे ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महाबळेश्वर येथून अटक केली. मागील अनेक दिवसापासून नाझीरकर ते पोलिसांना गुंगारा देत होता. नाझीरकर याच्यावर पुण्यातील दत्तवाडी व अलंकार पोलिस ठाण्यात तर मुंबई येथील एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पुढील कारवाईसाठी त्याला बारामती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना अलंकार पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली. न्यायालयाने आरोपीला सात एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाझीरकर यांच्याकडून त्यांच्या सास-याचे बनावट मृत्युपत्र हस्तगत करायचे आहे. सासरे व पत्नीच्या नावाने गुंतवलेल्या पैशांची चौकशी करायची आहे. मालमत्ता खरेदी करताना त्याचा व्यवहार कसा झाला. नाझीरकर यांचे कुटुंबीय आणखी किती कंपन्यांमध्ये भागीदार आहेत याचा तपास करावयाचा आहे. त्यांच्या आणखी कुठे मालमत्ता आहेत, या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी नाझिरकर यांना पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला.