पुणे : कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून एका तरुणाने एचआर मॅनेजर असलेल्या तरुणीच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून घरात घुसून बलात्कार करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.
गोविंद बेहरे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकरशेठ रस्त्यावरील सायबर नेक्स या कंपनीत आरोपी गोविंद बेहरे हा काम करत होता. याच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या एका तरुणीला अपमानास्पद वागणूक दिल्याने एच आर मॅनेजरने त्याला कामावरून काढून टाकले होते. हाच राग मनात धरून आरोपीने त्यांच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून शिव्या आणि धमक्या देण्यास सुरुवात केली.
दरम्यान पीडितेने हे सर्व मेसेज वकील असलेल्या आपल्या बहिणीला दाखवले. या सर्व प्रकारानंतर त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रारही दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.