वर्दीतील माणुसकी ! जखमी महिलेला ४ किलोमीटर झोळीतून नेले

0

पिंपरी : धावत्या रेल्वेची धडक बसल्याने रेल्वे लाईन ओलांडत असणाऱ्या ४२ वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्या. यावेळी लोहमार्ग पोलिसांनी माणुसकी दाखवत जखमी महिलेला चार किलोमीटर झोळीतून स्वतःच्या खांद्यावर नेले. यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले आहेत.

आशा दाजी वाघमारे (वय ४२) असे या महिलेचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबरुंग येथे रेल्वेलाइन ओलांडत असताना धावत्या रेल्वे गाडीची धडक लागल्याने आशा यांच्या मणक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. जांबरुंग रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक महिला जखमी अवस्थेत असल्याची माहिती लोणावळा स्टेशन मास्तरांनी दिल्यानंतर लोणावळा लोहमार्ग दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस नाईक जाधव व चार हमाल मालगाडीच्या इंजिनमध्ये बसून घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमी महिलेला झोळीत उचलून चार किलोमीटर अंतर पायी चालत पार केले. त्यानंतर पळसदरी रेल्वेस्टेशन येथून रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला कर्जत येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.