पुणे : मागील दोन दिवसांपासून राज्यातील थंडीचा पारा घसरण्यास सुरूवात झाली असून सर्वदूर हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. पुण्यातला तापमानाचा पारा मंगळवारी तर कमालीचा घसरला आणि हंगामातील निचांकी ८.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शिवाय पुढील चारपाच दिवस कमी-अधिक प्रमाणात गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पुण्यात तापमान ८.१ अंश सेल्सिअस होते, तर पाषणामध्ये ८.८ आणि लोहगावमध्ये १०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस कोरडे हवामान राहणार आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाहही कमी-अधिक प्रमाणात कायम राहणार आहेत. तापमानात किंचित वाढ होणार असली, तरी काही दिवस थंडी कायम राहणार आहे.
दरम्यान, रात्रीबरोबरच दिवसाही गारवा जाणवत असल्याने उबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडणे कठीण झाले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने सोमवारपासून थंडीचा कडाका वाढला. महिन्यानंतर पुण्यातील किमान तापमान सरासरी आणि १० अंशांच्या खाली गेले. सोमवारी ९.२ अंश सेल्सिअस, तर मंगळवारी ८.१ अंशांपर्यंत तापमानात घट झाली. त्यामुळे पुणेकरांना चांगलीच हुडहुडी भरली. नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या आठवडय़ात शहरात थंडीला सुरूवात झाली होती. १२ नोव्हेंबरला हंगामातील नीचांकी ८.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.