ठाणे : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे की, “पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत.”
विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळीही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. याप्रकरणी कोर्टाकडून आव्हाडांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत जितेंद्र आव्हाडांवर पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला. एका महिलेनं विनयभंगाची तक्रार दाखल करत आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाडांवर दाखल होणारा हा दुसरा गुन्हा आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.