कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी मध्यमांशी बोलतांना शरद पवार यांनी शिवसेनेचे ठाकरे गट आणि वंचित आघाडी यांच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे. शरद पवार यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली असून त्यांच्या या व्यक्तव्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे टेन्शन वाढणार आहे.
कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शरद पवारांनी वंचित बहुजन आघाडी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा केलेली नाही. याबाबत भूमिका स्पष्ट झाली नाही. आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. मात्र, आमची वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे काय चालले आहे, याची माहिती आम्हाला नाही, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी आघाडीची चर्चा झालेली आहे आणि पुढील निवडणुकीत आम्ही एकत्र सामोरे जाऊ, असे आमचे मत आहे. वंचित बहुजन आघाडीशी युती करण्यासोबत आमच्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे आम्ही त्याची चर्चा करणार नाही. त्यांच्यासोबतच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्यासमोर नसल्यामुळे कुणाला किती जागा वाटप होणार, यावर चर्चाच होऊ शकत नाही, असेही पवार म्हणाले.