मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिठाई भरवली, आणि पुष्पगुच्छ दिला. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे.
“राज्यपालांच्या लोकप्रतिनिधींच्या वागण्यात ‘गुणात्मक बदल’ दिसून येत आहे. मी अनेक शपथविधी समारंभांचा भाग होतो, परंतु कोणत्याही राज्यपालाने मला मिठाई दिली नाही किंवा पुष्पगुच्छ दिले नाहीत.” अशी पवारांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना टीका केली.
“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा मी पाहिला. राज्यपाल त्यांना पेढे खाऊ घालत होते आणि पुष्पगुच्छ देत होते. त्यांच्यात काही गुणात्मक बदल झाल्याचे दिसते आहे. चला आनंद आहे एकंदरीत त्यांनी कार्यपद्धतीत बदल केला.” असे पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शपथविधीवेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचा उल्लेख केला. तरी, यावर कोश्यारी यांनी त्यावेळी कोणताही आक्षेप नोंदवला नाही. असे देखील पवार म्हणाले.