मुंबई : राज्यात चालू आणि संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक मोठे विधान व्यक्त केले. एका बड्या नेत्याशी खासगीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मला एकट्याला भाजपविरोधात लढावे लागेल, असे वक्तव्य केले आहे. यामुळे मविआच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित होत आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका काँग्रेस नेत्यासोबत बोलताना ‘मला एकट्याला भाजपसोबत लढावे लागेल’ असे विधान केले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महाविकासआघाडी टिकणार का? आघाडीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या सुरस चर्चा रंगल्या. तर दुसरीकडे शरद पवारांनी पक्ष एकसंध असून सर्व सहकाऱ्यांची पक्ष शक्तिशाली करण्याची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया देत या चर्चांना स्वल्पविराम दिला आहे. त्यावर अजित पवार यांनी अशा चर्चांना पूर्णविराम दिला.
राज्याच्या राजकारणात उलथापालथी होत आहेत. एकीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने सलग दहा वर्षे सत्ता उपभोगली. राष्ट्रवादी काॅंग्रेस नेहमी सत्तेला महत्व देते. राष्ट्रवादीच्या उदयानंतर २०१४ साली शरद पवारांच्या पक्ष प्रथमच विरोधी बाकावर बसला. २०१४ ते २०१९ या काळात राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार होते. त्यानंतर २०१९ ला शिवसेना भाजप युतीचे बिनसले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेसचा हात आणि घड्याळाची साथ घेत राज्यात सत्ता स्थापली. जेमतेम अडीच वर्ष सरकार चालले. त्यानंतर फूटीच्या राजकारणाचा फटका मविआला बसला.