मी तुला खूप लाईक करतो म्हणत केला मुलीचा विनयभंग

आरोपीला न्यायालयाने सुनावली सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा

0

पुणे : ‘मी तुझा मित्र असून मी तुला खूप लाईक करतो. मी माझा मोबाईल नंबर देतो त्याच्यावर व्हॉटस्अपला हाय म्हणून मेसेज पाठव. आपण उद्या भेटू’ असे म्हणून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत विनयभंग करणा-या तरुणाला न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला.

अमोल घाटे (वय १९) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. नोव्हेंबर व ऑक्टोंबर २०१८ रोजी हडपसर परिसरात हा प्रकार घडला होता. त्याप्रकरणी १४ वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमोल याने अल्पवयीन पिडीतेचा पाठलाग करून मी तुझा मित्र असून मी तुला खूप लाईक करतो. मी माझा मोबाईल नंबर देतो त्याच्यावर व्हॉटस्अपला हाय म्हणून मेसेज पाठव उद्या भेटू असे म्हणून पाठलाग करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपीला अटक करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. यामध्ये त्यांनी सहा साक्षीदार तपासले. खटल्यात संबंधित मुलगी व तिच्या मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. गुन्ह्याचा तपास हडपसर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक एस. एस. गावडे यांनी केला. न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी आर. एन. कांबळे यांनी त्यांना मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.