मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत बोलताना आणखी एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रखर टीका केली होती. शरद पवार नास्तिक असून ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नसल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी पवारांवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मी फक्त शाहू – फुले – आंबेडकरांचं नाव घेतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही हा आरोप खोटा आहे. मी बारामतीच्या मंदिरात जातो, राज ठाकरेंनी बारामतीत जाऊन विचारावं. मी कधी मंदिरात गेल्याचा गाजावाजा करत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंबाबतही वक्तव्य केलं.
बाबासाहेब पुरंदरेंच्या मताशी मी असहमत होतो, हो मी पुरंदरेंबाबत बोललो होतो. पुरंदरेंवर टीका करणाऱ्यांचा मला अभिमान असल्याचं पवार म्हणाले. त्यासोबतच राज ठाकरे यांचे आरोप पोरकट असून जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. मतदारांनीच मनसेला संपवलं आहे, असं म्हणत पवारांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.