मुंबई ः प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज सकाळी शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश घेतला आहे. त्यासंदर्भात नियोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, ”मी पिपलमेड स्टार आहे. त्याचप्रमाणे मला ‘पिपलमेड लीडर’ व्हायला आवडेल. शिवसेनेत प्रवेश घ्यावा, यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षभरात खूप चांगलं काम केलेलं आहे”, असे कौतुकाचे शब्द त्यांनी सरकारबद्दल काढले आहेत.
”करोना, वादळ आणि इतर आपत्तीतही या सरकारने चांगलंच काम केलं आहे. या सरकारने विशिष्ठ धर्माच्या लोकांनाच विशेष वागणूक दिली नाही. सगळ्यांना समानतेनं वागविलं आहे. हा बाब महत्वाची वाटते. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा दर्जा वाढवा, अशी माझी इच्छा आहे. यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीचा भक्कम भाग झाले, याचा अभिमान आहे”, असे मत उर्मिला मातोंडकर यांनी मांडले.
”कुणावरीही आरोप करत मला प्रसिद्धी मिळवायची नाही. तो अत्यंत सोपा मार्ग आहे. काॅंग्रेसमध्ये मला पदाची अपेक्षा नव्हती आणि शिवसेनेतही मला अपेक्षा नाही. लोकांसाठी काम करायचं आहे. म्हणून शिवसेनेत आले आणि एक शिवसैनिक म्हणून काम करेन”, असेही मातोंडकर यांनी सांगितले.